भारतीय जनता पक्ष
भारतीय जनता पक्ष हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. या पक्षाची विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत संलग्न असून त्याची धोरणे उजवीकडे झुकणारी आहेत असे मानले जाते. २०१४ सालापासून संसदेच्या लोकसभा सभागृहामध्ये भाजपचे बहुमत असून विद्यमान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे सदस्य आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत परत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला ४८ पैकी २३ जागा मिळाल्या. तसेच शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युतीने ४८ पैकी ४२ जागी घवघवीत यश मिळवले. भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी हे वाराणसीतून निवडून आले आहेत.
भारतीय जनसंघ (१९५१-७७)
१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व ह्यादरम्यान निदर्शने करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला.
१९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली. युतीचे राजकारण करण्यासाठी जनसंघाला आपली अनेक कट्टर हिंदूवादी धोरणे व विचार बदलणे भाग पडले.
जनता पार्टी (भारतीय जनसंघ) (१९७७-८०)
१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात कोंडून ठेवण्यात आलं. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले.
भारतीय जनता पार्टी(पक्ष) (१९८०-चालू)
जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. भाजपचा चेहरामोहरा जनसंघासारखाच होता.
पदवीधर प्रकोष्ठ
भारतीय जनता पक्ष हा देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही जनसामान्यांच्या समस्या सोडवण्याच्या निगडीत असल्यामुळे, या पक्ष्याची विचारधारा जनसामान्यांपर्यंत आणि तळागाळा पर्यंत पोहोचावी यासाठी समाजातील जे वेगवेगळे आयाम आहेत त्या आयामापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रकोष्ठाची स्थापना केली.